
Chandrapur News: चंद्रपूर महापौरपदाचा पेच कायम! उबाठा-वंचित गट नोंदणीने वाढली काँग्रेसची डोकेदुखी, भाजपची गणिते जुळणार?
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत आघाडीतील जनविकास पक्षाचे ३ नगरसेवक आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे एकूण संख्याबळ ३० आहे. महापौरपदासाठी बहुमत मिळवण्यासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांची गरज आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन भाजपने आवश्यक १० नगरसेवकांसोबत सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू केली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
भाजपकडे २३ नगरसेवक असून युतीतील शिवसेनेचा १ नगरसेवक त्यांच्यासोबत आहे. यामुळे भाजप-शिवसेना युतीचे संख्याबळ २४ आहे, आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांना आणखी १० नगरसेवकांची गरज आहे. उबाठाने वंचित व दोन अपक्ष नगरसेवकांसोबत १० नगरसेवकांची गटनोंदणी केल्यामुळे काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ झाली असून, भाजपसाठी महापौरपद मिळवण्याची संधी निर्माण झाल्याचे जाणकार म्हणतात.
चंद्रपूर महानगरपालिकेत संख्याबळात काँग्रेस, भाजपनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना उबाठाने वंचितसह ८ नगरसेवकांचा गट स्थापन केले. आता या गटात काँग्रेसचे बंडखोर अपक्ष निवडून आलेले नगरसेवक नंदू नागरकर व प्रशांत दानव यांनी सामिल होत उद्धवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांची संख्या १० वर पोहचली. तर जनविकास सेनेने एमआयएम सोबत ४ नगरसेवकांची गटनोंदणी केली. यामुळे महापालिकेतील सत्ता समीकरणात बदल झालेला आहे.
खा. धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. २३) १३ नगरसेवकांसह विभागीय कार्यालयात चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गट नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. विभागीय कार्यालयाने कागदपत्रांची तपासणी केली असली, तरी अद्याप काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी झाली नाही. काँग्रेस गटनोंदणीसाठी प्रदेशाध्यक्षांचे पत्र आवश्यक असल्यामुळे, मंगळवारी (दि. २७) काँग्रेसच्या २७ नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी होईल की, दोन गटात विभागणी होईल, हे पाहण्यास राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.