Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा गट असून कर्जत पंचायत समितीचे १२ गण आहेत. या निवडणुकीसाठी २७ जानेवारी ही नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या कालावधीत राजकीय पक्ष युती घडवून आणण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
यातील उकरूलमध्ये शिंदे गटाने उमेदवार देखील दिला नाही. तर नेरळ आणि दामत गणातील उमेदवार माघार घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपाकडून चार जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यातील एक गट युतीमध्ये मिळावा यासाठी भाजप आग्रही आहे. एकही जिल्हा परिषद गट मिळाला नाही तर कदाचित भाजपा उमेदवार आपले अर्ज कायम ठेवण्याची भीती शिंदे गटाला आहे. मागील वेळी दोन जिल्हा परिषद गटामध्ये विजय मिळविणाऱ्या शेकापला शिंदे गटाने कर्जत पंचायत समितीचे तीन गण दिल्याची चर्चा आहे. त्यात पोशीर, कळंब आणि पाथरज असे तीन गण देण्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असून या तिन्ही जागा महिलांसाठी राखीव आहेत.
मात्र शेकापने एकही जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार दिला नव्हता आणि त्यामुळे शेकापकडून ही युती मान्य असल्याचे जवळपास नक्की आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये यावेळी शेकाप नाही, हे जवळपास नक्की आहे. परंतु कर्जतमध्ये शिंदे गट, भाजपा आणि शेकाप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना शिंदे गट निर्णायक यश मिळविण्यासाठी भाजपा आणि शेकाप यांना एकत्र घेण्याच्या प्रयत्नात आहे. शिंदे गटाकडून भाजपा आणि शेकाप यांना कर्जत पंचायत समितीमध्ये प्रत्त्येकी तीन-तीन जागा दिल्या असल्याचे बोलले जात आहे. पण भाजपा एका जिल्हा परिषद गटासाठी उत्सुक असल्याने युतीची अधिकृत घोषणा होण्यात उशीर होत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाला तीन गण युतीमध्ये देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यात नेरळ गण, दामत गण आणि उकरूल गाण यांचा समावेश आहे. त्यातील नेरळ आणि दामत है दोन गण सर्वसाधारण असून उकरूल गाण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे.






