Chandrapur News: धान कापणी सुरू असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी; सिंदेवाहीतील शेतकऱ्यांची चिंता वाढली
काही शेतकऱ्यांनी धान कापून शेतात ठेवले आहे, तर काही ठिकाणी मळणीची तयारी सुरू आहे. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन आभाळ भरून आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी शक्य तितक्या लवकर कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऐन कापणीच्या आणि मळणीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्यास धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
कापून शेतात ठेवलेले धान भिजल्यास दाण्यांचा रंग बदलणे, काळे पडणे, गुणवत्ता खालावणे आणि बाजारभाव कमी मिळणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच शेतात उभे असलेले पीक पावसामुळे जमिनीवर लोळल्यास कापणी आणि मळणीची कामे अधिक कठीण होऊन उत्पादनात घट होण्याची भीती आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि शेतीकामांसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरला आहे. अशातच कापणीच्या तोंडावर हवामानातील बदलामुळे निर्माण झालेल्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढवली आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतातील कामांवरही परिणाम होत असून, मजुरांची उपलब्धता, कापणीसाठी लागणारी साधने आणि मळणीची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अनेक शेतकरी पीक सुरक्षित करण्यासाठी धान कापून बांधणी करण्यावर भर देत आहेत. मात्र, पाऊस पडल्यास कापलेले धान वाचविणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
तारळी प्रकल्पाला MPCB चा थेट ‘स्टॉप वर्क’ आदेश; अदानी प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा हंगाम पुन्हा संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्याना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू नये, यासाठी हवामानाच्या अंदाजानुसार शेतीची कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता असून, त्यामुळे परिसरातील बळीराजा सध्या आभाळाकडे नजर लावून बसला आहे.






