पुणे : पीएमपीएमएलकडून गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी बसेसच्या सेवेत बदल केला आहे. स्वारगेट आणि डेक्कन या बसथांब्याचे या दिवशी तात्पुरते पर्यायी जागेत स्थलांतर केले जाईल. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक, डेक्कन चौक वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात. यामुळे स्वारगेट व डेक्कन चौकातील बस थांबे तात्पुरते स्थलांतीरीत केले जाणार आहेत.
शाहू महाराज स्थानक (स्वारगेट) येथील बसेस या सातारा रस्त्याने कात्रज, मार्केट यार्डकरीता लक्ष्मी नारायण चौक येथून सुटतील. नटराज बसस्थानक येथून सिंहगड रोडकडे जाण्याकरिता पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) येथून बसेस साेडल्या जातील. स्वारगेट स्थानकाबाहेर सोलापूर रस्त्याने पुलगेट, हडपसर करिता जाणाऱ्या बस वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ) येथून साेडल्या जातील. स्वारगेट स्थानकाबाहेर भवानी पेठ, नानापेठ, रास्तापेठ करिता जाणाऱ्या बस वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ) येथून साेडल्या जाणार आहेत. डेक्कन जिमखाना स्थानक, कोथरूड डेपो, माळवाडी, एनडीए गेटकडे जाणाऱ्या बस एसएनडीटी कॉलेज जवळून साेडल्या जातील.
मुख्य रस्ते राहणार बंद
पुण्यात विसर्जनाच्या दिवशी लक्ष्मी रोड, टिळक रोडसह शहरातील प्रमुख रस्ते बं केले आहेत. लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड, बाजीराव रोड यासह प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत.
९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूकीला सुरुवात
पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होणार आहे. अनेक रस्त्यावर नो पार्किंग तर अनेक मार्ग एकेरी करण्यात आलेले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. त्यामध्ये लक्ष्मी रोड, टिळक यासह इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.