
सध्या जगभरात ऍनिमेशन आणि गेमिंगची चलती आहे. विशेष करून हॉलिवूडसोबतच भारतातही या क्षेत्रातील तंत्रज्ञाची गरज भासते. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रात १२ ‘एव्हीजीसी’ (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग अँड कॉमिक) आणि ‘एक्सआर’ (एक्स्टेंडेड रिऍलिटी) पार्क्स उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या १२ पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगरचाही समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्राच्या सर्जनशील आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात १२ अत्याधुनिक ‘एव्हीजीसी’ आणि ‘एक्सआर’ पार्क्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचा समावेश असणार आहे. शासनातर्फे हायस्पीड इंटरनेट सुविधा आणि अखंड वीजपुरवठा करेल. महाराष्ट्राला डिजिटल कन्टेन्टचे हॉलिवूड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत ५० एकर जागेवर हे पार्क उभे केले जाणार आहे. मात्र संभाजीनगरात जागेच्या अभावी हे पार्क कुठे होईल हे अद्याप समोर आलेले नाही. या पार्कमध्ये व्हच्र्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित रेंडरिंग सुविधा आणिडिजिटल कटेट निर्मितीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संभाजीनगरचाही या महत्त्वाकांक्षी उपक्रमात समावेश करण्यात आला असल्याने आता शहरात डिजिटल मीडिया, ऍनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, स्थानिक युवक, स्टार्टअप्स आणि सर्जनशील क्षेत्रातील उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत.