
डिझेलअभावी शेंदूरवादा येथील रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून 'व्हेंटिलेटर'वर (Photo Credit- X)
आजारी रुग्णांचे मोठे हाल
डिझेलसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध न केल्याने वाहन निष्क्रय पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या निष्काळजीपणाचा सर्वाधिक फटका शेंदूरवादा व परिसरातील ग्रामीण नागरिकांना बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात हलवता न आल्यामुळे प्रसूती रुग्ण, अपघातग्रस्त, वृद्ध व गंभीर आजारी रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा उपचारांमध्ये विलंब होत आहे. परिणामी रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ डिझेलसारख्या अत्यावश्यक बाबीअभावी रुग्णवाहिका सेवा बंद राहणे हे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
कागदपत्रांचा घोळ की प्रशासकीय दिरंगाई?
शासनाने रुग्णवाहिकांच्या डिझेल 66 सदर्भातील कागदपत्रांची पूर्तता ही अत्यंत किचकट स्वरूपात निश्चित केली आहे. या प्रक्रियेमुळे केवळ प्रशासनच नव्हे, तर डिझेल पंपचालक देखील या कागदपत्रांना वैतागले आहेत, परिणामी रुग्णवाहिकांच्या डिझेलची बिले मंजूर होण्यास विलंब होत आहे. मात्र ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच सर्व प्रलंबित बिले मंजूर करून रुग्णवाहिका सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. असे गंगापूरचे तालुका आरोग्य अधिकारीस रंगनाथ तुपे यांनी म्हटेले आहे.
नागरिकांना तीव्र आंदोलनाचा इशारा
डिझेलसारख्या साध्या कारणामुळे रुग्णवाहिका बंद असणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. ग्रामीण भागात आपत्कालीन रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका जीवनदायी ठरते. प्रशासनाने तात्काळ डिझेलची व्यवस्था करून रुग्णवाहिका सुरू करावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले यांनी दिला आहे.