
खरीप पिकांचे कंबरडे मोडले! (Photo Credit - X)
मका उत्पादनात मोठी घट, खर्चही वसूल झाला नाही
तालुक्यात यावर्षी खरीप मका पिकाची सर्वात जास्त म्हणजे ४९ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. हे पीक साधारणपणे साडेतीन महिन्यांत काढणीसाठी येते.
मागच्या वर्षीची स्थिती: गतवर्षी मक्याला रु. २,२०० प्रति क्विंटल भाव मिळाला होता आणि सरासरी उत्पन्न एकरी २२ ते २५ क्विंटल होते, ज्यामुळे हे पीक फायद्याचे ठरले होते.
यंदाची स्थिती: सततच्या पावसामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली. मका पिकाचे सरासरी एकरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटलपर्यंत खाली आले. सरासरी बाजारभाव रु. ८०० ते रु. १,४०० मिळाल्याने, मक्यापासून एकरी सरासरी रु. १२ ते रु. २१ हजार उत्पन्न मिळाले.
आर्थिक फटका: मका सोंगणीसाठी एकरी रु. ८ ते रु. ९ हजार खर्च आला. नांगरणी, बियाणे, खत, कीटकनाशक फवारणी, निंदणी हा सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही, उलट खिशातून पैसे खर्च झाले.
कपाशी आणि आडसाली पिकालाही मोठा फटका
मका पिकाखालोखाल कपाशी पिकाची ३१ हजार ५९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. अतिपावसाने या पिकाच्या उत्पन्नातही प्रचंड घट आली. कपाशीचे एकरी सरासरी ४ ते ११ क्विंटल उत्पन्न हातात आले. बाजारात कपाशीचा सरासरी भाव रु. ५ हजार ते रु. ६,५०० मिळत असल्याने उत्पादन खर्च वजा केल्यास ही शेतीही तोट्यात गेली आहे. याशिवाय, अतिपावसाने आडसाली पिकालाही मोठ्या प्रमाणात सड लागल्याने उत्पादनात प्रचंड घट येत आहे.
ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल
ऊस पीक अतिपावसातही तग धरून राहते, तसेच त्याला हमीचे उत्पन्न मिळते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आता ऊस पिकाकडे मोर्चा वळवला आहे. यंदा तालुक्यात ऊसाची विक्रमी लागवड होण्याचा अंदाज आहे. शेतकरी सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड करून जास्तीचे उत्पादन निघणाऱ्या ऊसाच्या जातींना प्राधान्य देत आहेत.
बारामती ॲग्रोचे आवाहन: “ऊस पिकाचे कितीही उत्पन्न आले तरी त्याचे गाळप करण्याची हमी राहील. शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानानुसार जास्त उत्पन्न देणाऱ्या सुधारित जातीच्या ऊसाची लागवड करावी,” असे आवाहन बारामती ॲग्रोच्या वतीने करण्यात आले आहे.