
ढोरकीन-ववा वडाळा मार्गावर 'खड्ड्यांचे साम्राज्य' (Photo Credit - X)
ऊस आणि कापूस वाहतूक झाली अशक्य
ढोरकीन, ववा आणि वडाळा या तिन्ही गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, शेतातील ऊस वाहतूक मोठ्या वाहनाने करणेही आता शक्य राहिलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून रस्ता बंद होता. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि गटारे साचली होती. कापूस, सोयाबीन, मका आणि बाजरी काढणीसाठी मळणीयंत्र शेतात नेण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागले आहेत. “शेतातील फुटलेला कापूस आणि इतर शेतमाल घरी आणायचा कसा, हा मोठा यक्ष प्रश्न आजही शेतकऱ्यांना भेडसावत आहे,” अशी हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा आरोप
शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा आमदार विलास भुमरे यांचे लक्ष वेधून पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. हा पाणंद रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असतानाही किरकोळही दुरुस्ती झालेली नाही. शेतकऱ्यांची मागणी वाढत असतानाही हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा जिल्हा परिषद फंडातून अद्यापही मजबूत झालेला नाही. ढोरकीन जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही, संबंधित लोकप्रतिनिधींनी याविषयी कधीही पाठपुरावा केलेला नाही, असा ग्रामस्थांचा स्पष्ट आरोप आहे.
‘नारळ’ घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा
शेतकरी आणि ग्रामस्थ वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत. शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांची ही हालअपेष्टा पाहता तातडीने रस्ता दुरुस्ती करावी, अशी ओरड हतबल झालेले शेतकरी करत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे. रस्ता तात्काळ मजबूत न केल्यास उपोषण, धरणे आणि रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.