
शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू आहे. बुधवारच्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील इंधन साठ्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
| इंधन प्रकार | एकूण उपलब्ध साठा (किलोलिटर) | एकूण विक्री (किलोलिटर) | शिल्लक साठा (किलोलिटर) |
| पेट्रोल | २५०५ | ८५० | १६५५ |
| डिझेल | २९९५ | ११५२ | १८४३ |
प्रशासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यात अजूनही हजारो किलोलिटर इंधन शिल्लक आहे. मात्र, मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अचानक मागणी वाढल्याने काही पंपांवरील साठा तात्पुरता संपला होता, ज्यामुळे तिथे ‘नो स्टॉक’चे फलक लागले. नवीन साठा आल्यानंतर हे पंप पुन्हा सुरळीत सुरू झाले आहेत.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. ट्रॅक्टर, मळणीयंत्रे आणि इतर शेती उपकरणांसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तसेच, कारखान्यांकडे होणारी उसाची वाहतूकही अंतिम टप्प्यात असल्याने ट्रक आणि ट्रॅक्टर्समुळे डिझेलची मागणी कमालीची वाढली आहे. हा डिझेलसाठीचा ‘पीक पीरियड’ असल्याने पंपांवरील साठा नेहमीपेक्षा लवकर संपत आहे आणि त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होत आहे.
पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पुरवठादार कंपन्यांकडून इंधनाचे टँकर सलग येत आहेत. मात्र, ग्राहक गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेत असल्याने पंप लवकर रिकामे होत आहेत. सध्या कडक उन्हाळा असल्याने गाड्यांमध्ये किंवा घरात अतिरिक्त इंधनाचा साठा करून ठेवणे अपघातांना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच इंधन भरावे.”
इंधनाचे वाढते जागतिक दर आणि संभाव्य तुटवड्यामुळे सर्वसामान्यांमध्ये दरवाढीचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. पंप चालक आणि तेल पुरवठादार कंपन्यांशी समन्वय साधून कुठेही इंधनाचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.