राज्यातील हवामनात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. संभाजीनगरसह मराठवाडा होरपळून निघत आहे. संभाजीनगरात विक्रमी ४३ अंशाच्या पुढे कमाल पार गेला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मान्सूनची आतुरतेने प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामानातील वेगवान हालचालींमुळे ठरलेल्या वेळेच्या चार दिवस आधीच मान्सूनची कूच सुरु आहे. मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर धडक मारली असल्याने आता त्याची वाटचाल भारताच्या दिशेने सुरु झाली आहे. अंदाजे १ जूनच्याही आधी केरळच्या किनारपट्टीवर मान्सून पोहोचून पुढे कोंकणमार्गे महाराष्ट्राकडे तो प्रवासाला लागेल असा अंदाज आहे.
यात हवामानात कोणताही अनपेक्षित अडथळा न आल्यास अंदाजे जूनच्या पहिल्या आठवडा अखेरीस म्हणजेच ८ ते ९ जूनपर्यंत मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्पाचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आवश्यक शेतीची कामे उरकून घेण्याचे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे.
मान्सून कोंकणमार्गे मराठवाड्यात अंदाजे १० ते १२ जूनपर्यंत धडक मारतो. यंदा मान्सूनची गती चार दिवस वेगाने होत आहे. या प्रवासात कुठेही रेंगाळला नाही तर अंदाजे ५ ते ८ जूनपर्यंत पोहोचू शकेल. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कुठेही मान्सूनने आगमन केल्यास प्रत्येक जिल्ह्यात त्याच दिवशी मान्सूनचे आगमन झाल्याचे समजले जाते. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यातही अंदाजे ५ ते ८ जूनपर्यंत मान्सूनच्या सुखद सरी बरसतील असा अंदाज आहे.






