
अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप (Photo Credit- X)
छत्रपती संभाजीनगरातील रमाई आवास घरकुल योजनेत कोट्यवधींच्या गैरव्यवहार झाला आहे. बनावट रेशनकार्डे, खोट्या करपावत्या, बोगस कागदपत्रे आणि अपात्र लाभार्थ्यांना मंजुरी देऊन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.लाभार्थी याद्या नियमबाह्य पद्धतीने तयार करून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.… pic.twitter.com/9xFWQO5az8 — Ambadas Danve (@iambadasdanve) July 7, 2026
लाभार्थ्यांची यादी डिजिटल प्रणालीऐवजी हाताने तयार करण्यात आली आणि तीच कोणतीही शहानिशा न करता समाजकल्याण विभागाने मंजूर केली. महानगरपालिका, पीएमसी तसेच संबंधित अभियंत्यांनी स्थळ पाहणी न करता लाभमंजूर केल्यामुळे अनेक अपात्र व्यक्तींना घरकुल मिळाले. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा नियम असतानाही पती-पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे घरकुल मंजूर करण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला.
यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी सांगितले कि, लाभार्थ्यांना स्वतःच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी शासनामार्फत महापालिका, जिल्हा परिषद व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निधी वर्ग करण्यात येतो. मात्र २०११ ते २०२२-२३ या कालावधीत प्राप्त झालेल्या अजर्जापैकी अनेक अर्जावर अंतिम कार्यवाही झाली नव्हती. काही प्रकरणांमध्ये अर्ज घरकुलासाठी अपात्र अथवा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू केली. यात एकूण ८४२ अर्ज प्राप्त झाले. लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून त्यांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट करपावत्या आणि रेशनकार्ड तयार करून त्यांच्याही नावांचा गैरवापर करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सांगत अंबादास दानवे यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात महापालिका, समाजकल्याण विभाग, पीएमसी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. ज्या अधिकाऱ्यांनी नियमबाहा मंजुरी दिली, बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभमंजूर केले आणि योजनेचा गैरवापर होऊ दिला, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार का, असा सवालही आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.