
student protest
पीएच. डी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू
पोलिसांनी संशोधक विद्यार्थ्यांना केले स्थानबद्ध
सरसकट पीएच.डी. फेलोशिपची मागणी
सोनाजी गाढवे / पुणे: सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी, वनार्टी, व अमृतच्या अंतर्गत पीएच. डी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन सातव्या दिवशी सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन देऊन पोलिसांनी संशोधक विद्यार्थ्यांना स्थानबद्ध केले. मात्र नियोजित भेट होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
आंदोलन ठिकाणी अरुण मते, भारत पवार, कृष्णा घाडगे, गीता मगर, अंजुम यामीन, अभिषेक गायकवाड, मंगेश घाटूळ, दिलीप सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एसएफआय, एआयएसएफ, महिला काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पॅन्थर परिवर्तन चळवळ, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे. विविध विद्यार्थी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन व्यक्त केले.
सरसकट पीएच.डी. फेलोशिपची मागणी
संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी, वनार्टी व अमृत यांच्या अंतर्गत पीएच.डी. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी केली आहे. तसेच पीएच.डी. फेलोशिपच्या रकमेतून घरभाडे भत्ता (HRA) व आनुषंगिक निधी (Contingency Grant) कपात रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संजय शिरसाट यांच्याशी चर्चा
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने संजय शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विषय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. तसेच बार्टीच्या २०२३ च्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने निर्णय घेतला असून, संशोधक विद्यार्थ्यांचा विषयही सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना सांगितले.
संशोधक विद्यार्थ्यांचे माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात निवेदन दिले.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
समाजकल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरू असून, शासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला असून, मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक
संशोधकांच्या विद्यार्थ्यांच्या मगाण्या
१.सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी, वनार्टी, व अमृतच्या अंतर्गत पीएच. डी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे.
२. पीएच.डी. फेलोशिपच्या रकमेतून घरभाडे भत्ता (HRA) व आनुषंगिक निधी (Contingency Grant) कपात रद्द करण्यात यावी.
३. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता असलेली ३५ वर्षांची वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात यावी.
४. सन २०२६ मध्ये पीएच.डी. नोंदणी केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना तातडीने संशोधन अधिछात्रवृत्तीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे.