
जायकवाडीत पक्ष्यांचा किलबिलाट ओसरला (Photo Credit - X)
४ हजार पक्षी संख्या कमी झाल्याचे स्पष्ट
जायकवाडी जलाशयात मासेमारी करण्यास बंदी असतानाही पानथळावर विदेशी पक्षांना जाळ्यात अडकून अनेकदा शिकाऱ्यांच्या तावडीत अडकावे लागत आहे. यंदाच्या पक्षी गणनेत यंदा ४ हजार पक्षी संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले असून अशीच स्थिती बन्य जीवांची देखील झालेली आहे.
पर्यावरणातील संतुलन बिघडले
यंदा पावसाळा लांबणीवर गेल्याने पर्यावरणातील संतुलन बिघडल्याचे दिसून आलेले आहे. अतिवृष्टीमुळे पक्षांसाठी शेतातील पीक महत्वाचे असतात. मात्र, यंदा पावसासोबत जमीन ही खरडून गेल्याने शेतात पेरणी करता आलेली नाही. यामुळे पक्षांची अन्नसाखळी मोडली असून वन्य जीवांना देखील अन्नासाठी नागरी वसाहती कडे वळावे लागलेले आहे.
मानवी हस्तक्षेप आणि बदलत्या हवामानाचा फटका
संपूर्ण अन्नसाखळी बिघडल्याने देश विदेशातून जायकवाडी धरण क्षेत्रात येणाऱ्या पक्षांची संख्या यंदा घटली असल्याचे दिसून येत आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यातील सोनवाडी, दक्षिण जायकवाडी खुले कारागृह दहीफळ, एरडगाव रामकोह वाकेफळ पिंपळवाडी, धरण क्षेत्रातील वीस ठिकाणी रविवारी पक्षीमित्र व वन विभागाच्या टीमने पक्ष्यांची गणना केली. यात २८ हजार पक्षी आढळले, मागील वर्षों ३२ हजार पक्षी आढळले होते. बदलते हवामान, मासेमारी मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे पक्षी संख्या घटल्याची शक्यता या पक्षी गणना दरम्यान समोर आली आहे.
‘फ्लेमिंगो’ची संख्याही रोडावली
पाणथळाच्या जागेवर पक्ष्याच्या हक्काचे क्षेत्र कमी होत असून यंदा थंडीचे प्रमाण कमी असल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा थंडी उशिरा सुरु झाल्याने परदेशातून येणाऱ्या पक्षांसाठी ती पोषक नसल्याने त्या पक्षांची संख्या देखील कमीच राहू शकते असे पक्षी मित्रांना वाटते. या वर्षी पाहुण्या पक्ष्याची संख्या कमालीची घटली असून जायकवाडीचे पक्षी अभयारण्याचे आकर्षण असलेली प्लेमिंगो १२५ च्या जवळपास आढळले असे वन्यजीव विभागाचे मानद वनरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.
कोणते पक्षी आढळले आणि कोणते घटले?
आढळलेले पक्षी: फ्लेमिंगो, पानकावळे, जांभळी पाणकोंबडी, हळदी-कुंकू बदक, लहान बगळा, व्हाईट नेक आयबिस, ग्लॉसी आयबिस, रिव्हर टर्न (नदी सुरय), पोचार्ड, नॉर्दर्न शोव्हेलर.
या पक्ष्यांच्या संख्येत झाली घट: हळदी-कुंकू बदक, मोर, तित्तर, पारवा, पानकावळा, विविध प्रकारचे बगळे (राखी, जांभळा), डोकरी, काळा शराटी, कापशी घार, पिंगळा, राखी धनेश, खंड्या, वेडा राघू, तांबट, पोपट, सुभग, कोतवाल, खाटीक, बुलबुल, ब्राह्मणी मैना, दयाळ आणि जांभळा शिंजीर.
“मानवी हस्तक्षेप वाढल्याने पाणथळावर येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. हे पर्यावरण संतुलनासाठी चांगले लक्षण नसून पक्ष्यांची अन्नसाखळी तुटत चालल्यानेच असे प्रकार वाढत आहेत.” – डॉ. किशोर पाठक, मानद वनरक्षक, वनविभाग.