छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर: उत्तरेकडील वातावरणात होत असलेल्या बदलांच्या परिणामी महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील (Chhatrapati Sambhajinagar Weather) याचा प्रभाव दिसून येत आहे. येत्या दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. रविवारी या हंगामात दुसऱ्यांदा किमान पारा ११. ८ अंशापर्यंत घसरल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
थंडीचा कडाका वाढणार
यंदा थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थंडीच्या कडाक्यात वाढ होत आहे. पुढील दोन दिवसात यात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यासाठी अतिशीत लहरींचा इशारा भारतीय हवामान खात्याने जारी केला आहे. मागील आठ दिवसांपासून किमान पारा सातत्याने खाली येत आहे. किमान पाऱ्यासोबतच कमाल तापमानातदेखील घसरण होत असल्याची नोंद होत आहे.
शनिवारी कमाल २८. ३ तर किमान तापमान १२. ६ पर्यंत घसरल्याची नोंद झाली तर रविवारी यात आणखी घसरण पाहायला मिळाली. रविवारी कमाल २८. ४ तर किमान ११.८ अंश सेल्शियसची नोंद झाली आहे. या हंगामात कमान तापमान दुसऱ्यांदा ११. ८ पर्यंत घसरले आहे. यापूर्वी सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी ११, ८ अंशाची नोंद झाली होती. येत्या दोन ते तीन दिवसात यात आणखी घसरण होऊन अतिशीत लहरींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करून ठेवणे गरजेचे असणार आहे.
कडाक्याच्या थंडीने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
उत्तर भारतात थंडी वाढल्यास मराठवाड्यापर्यंत थंड आणि कोरडे वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागतात. यामुळे मराठवाड्यात थंडीच्या कडाक्याच्या वाढ होते. हीच परिस्थिती सध्याची आहे. पहाटे आणि रात्री कमालीचा गारवा अनुभवायला मिळत आहे. तर दिवसा ऊन असतानादेखील थंड वारे त्रासदायक ठरत आहेत. तापमानात गारवा वाढल्याने सर्दी, डोकेदुखीसारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याशिवाय कान-नाक-घसा तसेच श्वसनाच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढीस लागल्याचे चित्र शहरात आहे.
उपाय योजना गरजेचे
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तसेच महाराष्ट्रातील हवामानातील बदलांमुळे संभाजीनगर जिल्ह्यातील तापमान उत्तरणीला लागले आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने वाऱ्यात गारवा वाढला आहे तर कमालीची हुडहुडीचा अनुभव होत आहे. उबदार कपड्यांचा वापर, थंड पाण्यापासून दूर राहणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक अन्न सेवक करणे असे उपाय गरजेचे असणार आहेत.






