'...तर आगामी निवडणुकीत सुपडासाफ करू'; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा
सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, समाजाची सद्यःस्थिती, तरुणांचे भविष्य आणि राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. ‘मराठा समाजाची दशा आणि दिशा’ यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, एकेकाळी पाच एकर शेती असलेला शेतकरी आज गळ्याला आला आहे. त्यामुळे पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे’.
तसेच मराठा समाजातील तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता पूर्णपणे व्यसनमुक्त राहावे. व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, उच्च शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे, तसेच चांगले उद्योग-व्यवसाय उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पाठीशी खंबीर उभे राहावे
समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण रात्रंदिवस लढा देत आहोत. या लढ्यात समाजाने खंबीरपणे आपल्या पाठिशी उभे राहावे, चांगले काम करणाऱ्यांना संपविले जात आहे. सत्य बोलणे आणि प्रामाणिक राहणे हाच आता गुन्हा ठरत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
500 कोटींच्या आरोपीची चौकशी करण्याची मागणी
सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित आरोपांचा उल्लेख केला. या प्रकरणाची चौकशी करा,’ असे आव्हान त्यांनी दिले. एका कथित चित्रफितीचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘ही चित्रफीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) तयार केलेली नाही, तर ती खरी आहे. त्याची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा; नाहीतर, या प्रकरणात तुमचा हात आहे हे समजेल. आणि तो कोणीही असो, त्याला सोडणार नाही,’ असा थेट इशारा त्यांनी दिला.
1. मनोज जरांगे पाटील यांनी कोणता इशारा दिला?
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा २०२९ च्या निवडणुकीत सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
2. मनोज जरांगे पाटील कुठे बोलत होते?
सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
3. जरांगे पाटील यांनी कोणत्या विषयांवर भाष्य केले?
मराठा आरक्षण, समाजाची सद्यःस्थिती, तरुणांचे भविष्य आणि राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.






