मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल (फोटो सौजन्य-X)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज (22 एप्रिल 2025) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या धमकीची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.
धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर उच्च न्यायालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, उच्च न्यायालयाचे सुरक्षा अधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलिस स्टेशन अधिकारी शिवचरण पांढरे तसेच बॉम्ब शोधक आणि नाथक पथकाचे चार पथके, एटीएसचे चार पथक खंडपीठात दाखल झाले. सध्या संपूर्ण परिसरात तपासणी सुरु असून , कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, धमकी असूनही उच्च न्यायालयात काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. न्यायालयात ज्या व्यक्तींना न्यायालयता उपस्थित राहायचे आहे ,त्यांना आत जाण्याची मुभा देण्यात आली. कोणताही गोंधळ न होता पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी आपले काम शांतपणे आणि दक्षतेने पार पडत आहे. संपूर्ण घटनेची सायबर पोलिसांकडूनही कसून चौकशी सुरु असून, धमकी कुठून आली याचा तपास केला जात आहे.