
डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश (Photo Credit - X)
महिलांच्या तक्रारीची दखल
विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार अब्दुल सत्तार शुक्रवारी डीग्रस गावात गेले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांची भेट घेऊन गावातील अवैध दारूविक्रीचा पाढाच वाचला. “अवैध दारूमुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत असून संसार उघड्यावर येत आहेत,” अशी कैफियत महिलांनी मांडली. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ. सत्तार यांनी तातडीने महिलांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
अजिंठा पोलिसांना कडक सूचना
महिलांच्या तक्रारीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाहूनच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (API) अमोल ढाकणे यांना फोन केला. “गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करा. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराबाबत तडजोड न करता कठोर कारवाई करा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गोपनीय
यावेळी आ. सत्तार यांनी ग्रामस्थांनाही आवाहन केले की, गावातील अवैध दारूविक्री किंवा अड्ड्यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे किंवा दुर्लक्षामुळे गुन्हेगारी वाढू नये, यासाठी वारंवार अशा गुन्ह्यांत सहभागी असलेल्यांवर मोक्का किंवा तडीपारीसारखी कठोर कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
पोलीस प्रशासनाचे आश्वासन
एपीआय अमोल ढाकणे यांनी आमदार सत्तार यांना आश्वासन दिले की, डीग्रससह परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जाईल. दोषींवर गुन्हे दाखल करून गावातून अवैध दारू हद्दपार केली जाईल, असे त्यांनी सांगितले.