अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! (Photo Credit - X)
तस्करांचे जाळे आणि रात्रीचा ‘खेळ’
मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा वनपरिक्षेत्रातील अजिंठा, शिवणा, उडणगाव, अंभई, माडणा, सराटी, हळदा, सवळदबारा आणि जामठी या भागांतील जंगले आणि शेतशिवारांमधील मौल्यवान झाडांची कत्तल केली जात आहे. लाकूड व्यापारी गरीब शेतकऱ्यांना पैशांचे प्रलोभन दाखवून ही झाडे विकत घेतात आणि वनविभागाकडून कोणताही परवाना न घेता रात्रीच्या अंधारात ट्रक भरून लाकडांची वाहतूक परराज्यात केली जात आहे.
पुराव्यांसह तक्रार करूनही प्रशासन ढिम्म
या अवैध वृक्षतोडीविरोधात ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश सनान्से यांनी मागील महिन्याभरापासून लढा पुकारला आहे. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ वन अधिकारी आणि खुद्द वनमंत्र्यांना लेखी तक्रार देऊन सर्व पुरावे सादर केले आहेत. मात्र, महिना उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “वरिष्ठांनी तातडीने लक्ष देऊन ही लूट थांबवावी,” अशी मागणी सनान्से यांनी केली आहे.
‘झाडे लावा’ मोहिमेचा फज्जा!
एकीकडे सरकार वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे हाताशी असलेल्या नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. वन विभाग, पोलीस आणि महसूल विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने लाकूड तस्करांचे धाडस वाढले आहे. रात्रीच्या वेळी वनविभागाची गस्त नसल्याचा फायदा हे तस्कर घेत असून, पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
वनप्रेमींच्या प्रमुख मागण्या
अजिंठा वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी वनविभागाची कडक गस्त सुरू करावी. अवैध वृक्षतोड आणि वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जप्तीची कारवाई व्हावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.






