पराग शेणोलकर, कराड : कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर होणारे वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी जुना कोयना पुल हलक्या वाहनांसाठी सुरू केला, मात्र ही वाहतूक शाळकरी मुलांच्या मुळावर उठली आहे. येथील पुलावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे लांबच लांब रांगा लागत आहेत. तर कोंडीवर कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी ताबडतोब प्रयत्न झाले नसलेतर शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम शहरातील चौका चौकात वाहतूक कोंडीच्या माध्यमातून दिसत आहे. कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर तर सर्वात जास्त वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र येथील काही प्रमाणात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्यास कोल्हापूर नाक्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, या सामाजिक उद्देशाने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जुना कोयना पुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर बांधकाम विभागाकडून पुलाच्या वजनाची चाचपणी देखील करण्यात आली. पुलाच्या दोन्ही बाजूला हाईट बॅरिगेट बसवण्यात आली.
दि. २७ मे २०२२ पासून या पुलावर कार, रिक्षा यांसारखी हलकी वाहनांची ये-जा सुरू करण्यात आली. तेव्हा अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर नाक्यावरील काहीशी वाहतूक कोंडी यामुळे निश्चितच कमी झाली, मात्र याची दुसरी बाजू आता हळूहळू समोर येऊ लागली आहे. कराड शहरातून कोल्हापूर नाक्याकडे जाणारी हलकी वाहने आता शाहू चौकातून पुढे जुन्या कोयना पुलाकडे जात आहेत, त्यामुळे कोल्हापूर नाक्यापासून कराड शहरात येणाऱ्या रस्ता व दत्त चौकापासून पंचायत समिती मार्गे कोल्हापूर नाक्याकडे जाणारी वाहतूक शाहू चौकात जाम होऊ लागली आहे.
दरम्यान, शाहू चौक ते शहर पोलीस ठाणे तसेच शाहू चौक ते स्वा. सै. दादा उंडाळकर चौक इथपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीत पादचारांसह दुचाकीस्वारही अडकत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक कुंडीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी कराड नगरपालिका व वाहतूक शाखेने व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
विश्रामगृह मार्गावर दुतर्फा पार्किंग
पंचायत समिती पासून आलेली वाहने शाहू चौकातून पुढे जुन्या कोयना पुलाकडे जातात. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा वाहनाचे पार्किंग असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे, तसेच येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर ठेवलेले फलक, रस्त्याकडेला टाकलेल्या लोखंडी जाळ्या देखील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे कराड नगरपालिका व वाहतूक पोलिसांनी येथील दुतर्फा पार्किंगबाबत पुन्हा विचार करून गरजेचे आहे.
राजर्षींच्या पुतळ्यास दुचाकींचा गराडा
राजर्षी शाहू महाराजांचे नाव या चौकाला दिले आहे. चौकालगत शाहू महाराजांचा आकर्षक अर्धाकृती पुतळा देखील बसवला आहे. मात्र हा पुतळा सातत्याने दुचाकींच्या गराड्यात असल्याचे दिसून येते. या दुचाकी देखील शाहू चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीला तितक्यात जबाबदार आहेत. पुतळाच्या समोर दुचाकीचा लागलेला असतात, मात्र येथे पार्किंग करणाऱ्या किती दुचाकींवर वाहतूक पोलिस कारवाई केली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
फक्त दुचाकी वाहतूक सुरू ठेवा
जुन्या कोयना पुलावरून पाटण वरून येणारे शालेय विद्यार्थी तसेच या मार्गावरील तांबवे, सुपने, विजयनगर, वारुंजी, मुंढे, गोटे व सातारकडून कराडकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये वाहगावपासून अलीकडे तासवडे, तळबीड, खोडशी, वनवासमाची या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी कराडला येतात. बहुतांश विद्यार्थी हे सायकल, दुचाकी अथवा पायी चालत येतात. जुन्या कोयना पुलावरून ये-जा विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने येणारे वाहने, बेशिस्त चालवणारे दुचाकी चालक यामुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे हा पुल फक्त दुचाकी आणि पादचारी यांच्यासाठी सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.