भाईंदर/ विजय काते : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे अपघाताचं प्रमाण वाढत जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. काशीमिरा परिसरातील सम्राट हॉटेलजवळ नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिचा एक हात गमवावा लागला आहे. या दुर्घटनेला अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी ट्रक चालकाने वाहन बेफिकिरीने चालवत थेट पादचाऱ्याला धडक दिली. हॉटेलसमोर नेहमीप्रमाणे वाहने अनधिकृतपणे उभी असल्याने रस्ता अरुंद झाला होता आणि यामुळेच चालकाचा अंदाज चुकला. अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वाहतूक व्यवस्थेच्या बेपर्वाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघातानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत, शिवसेना पदाधिकारी आणि विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी पीडित महिलेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच वाहतूक विभागाच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप करत, “या अपघाताची माहिती आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची सविस्तर माहिती आपण थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत,” असे मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे.