कार्ला येथील एकवीरा देवीच्या यात्रेनंतर दोन गटात हाणामारी झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maval News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर येथे चैत्र यात्रेनिमित्त पार पडलेल्या पालखी सोहळ्यानंतर रात्री उशिरा भाविकांच्या दोन गटांमध्ये भीषण हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. (Maval News)
जुन्या वादातून हिंसक संघर्ष
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण आणि पनवेल येथील कोळीवाड्यातील दोन गटांमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू होता. यात्रेचा मुख्य कार्यक्रम आणि पालखी सोहळा शांततेत पार पडल्यानंतर रात्री उशिरा हे दोन्ही गट एकमेकांसमोर आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला; मात्र काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
हे देखील वाचा : नांदेडमध्ये पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे दिले ‘हे’ निर्देश
दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
अफवांना उधाण; प्रशासनाचे स्पष्टीकरण
या मारहाणीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा पसरू लागल्या. या पार्श्वभूमीवर श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ भूमिका स्पष्ट केली. “ही घटना दोन गटांमधील वैयक्तिक व जुन्या वादातून घडली असून तिचा देवीची यात्रा, पालखी सोहळा किंवा देवस्थान व्यवस्थेशी कोणताही संबंध नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. तसेच भाविकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले.
हे देखील वाचा : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. सध्या गड परिसर व पायथ्याशी शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांतील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
यात्रेच्या पवित्रतेवर परिणाम होऊ नये
चैत्र यात्रेला राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित राहतात. अशा धार्मिक आणि पवित्र वातावरणात घडलेली ही घटना चिंतेची बाब मानली जात आहे. यात्रेच्या शांततेला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पोलिसांनी नागरिक व भाविकांना शांतता राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. एकंदर, दोन गटांतील जुन्या वादातून निर्माण झालेल्या या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला असला, तरी पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे.






