संग्रहित फोटो
नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता नाशिकमध्ये (Crime in Nashik) धक्कादायक घटना घडली. सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेल्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद (Clashes on Mobile Issue) झाला. या वादात लोखंडी सळईने तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु केला आहे.
नितीन गणपत जाधव असे यामध्ये मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरूणाचे नाव आहे. नितीन जाधव याला नाशिकच्या सिडको परिसरात एक मोबाईल सापडला होता. नितीन हा सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेला होता. त्यावेळी पत्नीशी आक्षेपार्ह बोलण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून तरुणाला लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली होती. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला होता. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली जात आहे.
15 दिवसांपासून सुरु होते उपचार
नितीन जाधव या तरुणावर हल्ला झाल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला वाचवण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून डॉक्टरांनी प्रयत्नही केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्रिमूर्ती चौकात गेला अन्…
नितीन जाधव हा 7 एप्रिलला मोबाईल सापडला होता. ज्या व्यक्तीचा हा मोबाईल आहे तो त्याला परत देण्यासाठी 8 एप्रिल रोजी त्रिमूर्ती चौकात गेला होता. यावेळी नितीनने पत्नीसोबत आक्षेपार्ह संवाद साधल्याचा संशयितांचा दावा होता. त्यामुळे नितीनला तिघांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.






