नाशिकमधील गिरणारे महामार्ग क्रमांक २६ वरील मखमलाबाद शिव ते यशवंतनगरदरम्यान अपघात वाढले (फोटो - istock)
सतत होणाऱ्या अपघातांमुळे ठेकेदाराच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गिरणारे महामार्ग क्रमांक २६ च्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महानगरपालिका हद्दीत रस्त्याचे खोदकाम सुरू असून, त्यानुसार वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे. मात्र, महानगरपालिका हद्दीबाहेरील कामासाठी स्वतंत्र ठेकेदार असल्याने या भागात रस्त्याचे खोदकाम न करता केवळ मशीनच्या साहाय्याने डांबरी थर काढण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर खडबडीत रेघा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
बिकट रस्ते अन् भरधाव पिकअपमुळे अपघातसत्र सुरू
एकीकडे रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, तर दुसरीकडे या मार्गावरून धावणाऱ्या पिकअप वाहनांचा वेगही चिंतेचा विषय बनला आहे. मागील आठवड्यात मुंगसरे फाटा येथे यशवंतनगर येथील दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करीत असताना भरधाव पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली.
या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच शुक्रवारी मखमलाबाद येथील शक्ती गवळी हा युवक दुचाकीवरून गिरणारेच्या दिशेने जात असताना हॉटेल शिवारसमोर भरधाव पिकअपने त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी
ने या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्यावर डांबरीकरण करावे. तोपर्यंत वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच पोलिसांनी या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष लक्ष देऊन भरधाव वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिक दत्तूनाना पिंगळे, अक्षय कातड, भिका सूर्यवंशी, प्रदीप पिंगळे, सुदर्शन पिंगळे, मोतीराम पिंगळे आणि शंकर तिदमे यांनी केली आहे.






