
नाशिक : महापालिकेतर्फे (Nashik Corporation) गेल्या एक महिन्यांपासून पावसाळापूर्व कामे सुरू करण्यात आली असून, मलनिस्सारण विभागातर्फे शहरातील हजारांपैकी 4079 चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली आहे. 450 किमी लांबीच्या भूमिगत गटारांपैकी 337 किमी गटारींची सफाई (Drainage Work) करण्यात आली आहे. तसेच 128 किमी लांबीच्या गटारी दुरूस्त करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी महापालिकेच्या बांधकाम विभाग तसेच मलनिस्सारण विभागामार्फत पावसाळापूर्व कामे केली जातात. अर्थात, ही कामे पावसाळा पंधरा दिवस राहिला की कामांना सुरूवात केली जात होती. यामुळे कुठे स्वच्छता केली तर केली नाही त्याकडे दुर्लक्ष असा मनपाचा कारभार असतो. परंतु, यंदा प्रथमच एक महिना आधीपासून या कामांना सुरूवात झाली आहे. यामुळे नाशिककरांना यंदा पाणी तुंबण्याच्या घटनांना कमी अधिक प्रमाणात सामोरे जावे लागू शकते. अन्यथा नाशिकमधील जवळपास अडीचशे ते तीनशे ठिकाणे अशी आहेत की जिथे पावसाळ्यात हमखास पाणी तुंबणारच!
त्यात गेल्या तीन आठवड्यापासून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे दीर्घ रजेवर असल्याने मनपाचा कारभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हाती आला आहे. यामुळे गमे यांनी मनपाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक कामांचा धडाका सुरू झाला आहे. त्यापैकीच एक म्हणजे पावसाळापूर्व कामांची सुरूवात म्हणता येईल. पावसाळापूर्व कामे खरोखरच वेळेत पूर्ण झाली तर नागरिकांना पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळेल, यात मात्र शंका नाही.
प्रशासन उपायुक्तांची पंचवटी कार्यालयास भेट
बांधकाम, पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागांमार्फत पावसाळापूर्व कामांना गती मिळाली आहे. मलनिस्सारण विभागामार्फत मॅनहोल, चेंबर्स, गटारींची सफाई तसेच दुरूस्तीची कामे सुरू आहेत. शहरात ४०० मॅनहोल आहेत. त्यापैकी ३२३ मॅनहोलची दुरूस्ती करण्यात आली आहे. ७७ कामे प्रगतीत आहेत. १३ हजार चेंबर्सपैकी ४०७९ चेंबर्सची स्वच्छता पूर्ण झाली आहे. उर्वरित १६२९ चेंबर्सच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. चारशेपैकी ३३७ किमी लांबीच्या गटारी स्वच्छ करण्यात आल्या आहेत. २०० किमी गटारींपैकी १२८ किमी लांबीच्या गटारींची दुरूस्ती झाली आहे.