फडणवीस सरकारकडून 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांचं प्रमोशन
महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा केल्या जात आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून 13 आयपीएस (IPS)अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. नव्या वर्षात आयपीएस व आयएएस (IAS) अशा मिळून जवळपास 70 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून मंगळवारी(ता.18) 6 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात हिंसाचाराची घटना उफाळलेल्या नागपूरसह गडचिरोली,नांदेड, जळगाव,पालघर या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यात समावेश आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार,नागपूरच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचं मोठं प्रमोशन करतानाच मुंबई जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मीनल करनवाल यांची जळगावला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी असलेल्या रणजित मोहन यादव यांची आता गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कवली मेघना यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. महायुती सरकारमधील बदल्यांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं दिसून येत आहे.
आंचल गोयल (आयएएस:आरआर:2014) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर,मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अंकित (आयएएस:आरआर:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मीनल करनवाल (आयएएस:आरआर:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कवली मेघना (आयएएस:आरआर:2019) प्रकल्प संचालक, आयटीडीपी, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
करिश्मा नायर (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.