
महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, "जिंकल्यावर उन्माद..."
महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कार्यकर्त्यांना संबोधन
मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसण्याचा अंदाज
CM Devendra Fadnavis/Maharashtra Politics: आज राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. जवळपास 29 पैकी 25 महापालिकेत महायुतीची सत्ता आली आहे. मुंबई महापालिकेत देखील महायुतीची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान राज्यात भाजप मोठा पक्ष ठरला आहे. तसेच महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. आज महायुतीला आणि भाजपला महाविजय मिळाला आहे. 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजप व महायुतीची सत्ता येते आहे. मुंबई महापालिकेत देखील निश्चित बहुमत महायुतीलाच मिळणार आहे. आपण या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. या विकासाच्या मुद्द्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राचा विश्वास हा पंतप्रधान मोदींवरच आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढलो त्याला जनतेने प्रतिसाद दिला. पुढेही आपला अजेंडा विकासाचाच असणार आहे. आमचा कार्याचा आत्मा आहे, विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववाद आहे. हिंदुत्ववादी आहोतच, याचा आम्हाला अभिमान आहे. आज याच्या माध्यमातून हिंदुत्व आणि विकास याला वेगळे करता येणार नाही. आम्ही संकुचित हिंदुत्ववादी नाही. एक व्यापक असे जनसमर्थन आपल्याला मिळालेले आहे.”
LIVE | महानगरपालिका निवडणूक 2025-26
भाजपाच्या महाविजयानिमित्त जल्लोष 🕠 संध्या. ५.४१ वा. | १६-१-२०२६📍मुंबई.@BJP4Maharashtra#Maharashtra #MunicipalCorporationElection #BMCElection https://t.co/OCdOGJR4dN — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 16, 2026
“आता आपली जबाबदारी वाढली आहे. जिंकल्यावर उन्माद नको हे कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. आपण सगळे निवडून आलो आहोत. मोदी आणि भाजपावरील विश्वासामुळे जिंकून आलो आहोत. याचे पालन कार्यकर्ते, नेते करतील. मी पुन्हा एकदा जनतेचे आभार मानतो. मी आमच्या मित्रपक्षांचे देखील आभार मानतो. महाराष्ट्रात महायुती मजबुतीने काम करेल हा विश्वास देतो. हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित असा विजय आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.