
CM Devendra Fadnavis targets DCM Ajit Pawar over free tickets on Pune Metro
Devendra Fadnavis : पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राज्यातील मुंबई,पुणे आणि 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचार सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौरा केला आहे. संवाद पुणेकरांशी या मुलाखत कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच महापालिका निवडणूका आणि राजकारणावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पुण्यातील राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी बस आणि मेट्रोचे तिकीट हे पूर्णपणे बंद करुन मोफत प्रवास देण्याचे जाहीर केले आहे. जाहीरनाम्यामध्ये याबाबत घोषणा केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा झाली. मात्र यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जोरदार निशाणा साधला आहे. संवाद पुणेकरांशी या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय, असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “खरंतर मी आज घोषणा करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमानं आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे, घोषणा करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं घोषणा करायला?” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लगावला आहे. यापूर्वी अजित पवारांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली.
आम्ही काहीही जाहिरनामे काढतो…
पुढे ते म्हणाले की, “अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक निवडणुका जिंकण्याच्या डेस्पिरेशनमध्ये, जेव्हा आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही. अशा स्थितीत आम्ही काहीही जाहिरनामे काढतो, त्या जाहिरनाम्यांमध्ये काहीही म्हणतो. तरीही माझं म्हणणं आहे की किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हणल्या पाहिजेत, ज्या आपण करू शकू…” अशी देखील टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे देखील वाचा : आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर
मेट्रोचा प्रवास मोफत करण्याबाबत अजित पवारांनी घोषणा केली खरी पण हे शक्य नसल्याचे देखील फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, “मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाहीये. मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोच्या बॉडीचे अध्यक्ष हे केंद्रिय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्राचे असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोचे आपण फेअर फिक्सेशन करतो, त्यावेळी कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीलाच कायद्याने दिलेले अधिकार आहेत. उद्या माझ्या मनात आहे की तिकीट माफ करून टाकायचं, तरी मला करता येत नाहीं. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे. ऑपरेशनल खर्चतरी निघाला पाहिजे. समाजा जर हा खर्च तुम्ही काढणार नसाल आणि सवलत द्याची असेल तर तुम्ही कुठून पैसे देणार हे सांगा,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवंय
पुढे त्य़ांनी अजित पवारांचे हे केवळ आश्वासन आहे हे पुणेकरांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे हे फक्त बोलायचं आश्वासन आहे कारण अजित पवार हे निवडून येणार नाहीत, असे स्पष्ट देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासने देऊ नयेत. पुणेकर वेळेवर टॅक्स भरणारे लोके आहेत. आता ऑनलाईनचा जमाना आहे. पण मी ते देखील बघितले आहे जेव्हा लाईन लावून टॅक्स, विजेचे बील भरणारे केवळ या पुण्यात बघितले आहेत. पुणेकरांना मोफत नकोय, पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवंय. पुणेकरांना उत्तम मेट्रो आणि बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे. आणि यासाठी किमान खर्च आहे तो पुणेकर देतील. त्यामुळे हे जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांना समजले आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हेही त्यांना माहिती आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.