संग्रहित फोटो
पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ॲड. आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, शहराध्यक्ष अरविंद तायडे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू ओव्हाळ यांनी सभेचे संयोजन केले. प्राण आवाड सूत्रसंचालन केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. मात्र आज संविधानात बदल करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. संविधान धोक्यात आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. संविधानाच्या रक्षणासाठी जागृत राहावे लागेल. कारण जोवर आपण जागरूक आहोत, तोवर संविधानाला हात लावण्याची हिंमत होणार नाही. भाजपाला हरवायचे असेल, तर आपल्याला शंभर टक्के मतदान करावे लागेल. सामान्यांच्या हक्कांसाठी, शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांसाठी न्याय मिळवून देणार्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. लोकांची घरे, पक्ष फोडून, भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन राजकारणाचे तीनतेरा वाजवणाऱ्या भाजपला घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा खरमरीत शब्दांत आंबेडकरांनी भाजपवर हल्ला चढविला.
आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय असून, एका शिवसेनेत जान नाही, तर दुसर्या शिवसेनेला खच्ची करण्याचे काम भाजपने केले आहे. अशावेळी जनतेच्या हितासाठी काम करणारे व लढणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन मतदारांना आंबेडकर यांनी केले.
गायकवाड म्हणाले, पुणे शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारांचे लोक एकवटले असून, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. काँग्रेससह अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना सर्वानीच शहराचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. अलिकडेच अजित पवार यांनी महार वतनाची जमीन लाटण्याचा केलेला प्रयत्न, तसेच शरद पवार यांचा पक्ष गिळंकृत करण्याचा केलेला प्रयत्न याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. या निवडणुकीत गुंडांना पाठीशी घालून त्यांना उमेदवारी देणार्या भाजप आणि राष्ट्रवादीला पराभूत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.”






