संग्रहित फोटो
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातून राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, यासोबतच तालुका, मंडल स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करणार आहे. संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असून हे वर्ष संघटन वर्ष आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशभरात संघटन सृजन अभियान सुरु झाले असून महाराष्ट्रात २७ मार्चपासून हे अभियान सुरु झालेले आहे. १ मे पर्यंत या संदर्भातील शिफारशींचा अहवाल पूर्ण होईल व त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जातील. राज्यात ७२ जिल्हाध्यक्ष व ७५० तालुका अध्यक्ष असतील. संघटना गावस्तरापर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामशाखा सुरु केल्या जाणार आहेत. याबरोबरच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस. एससी, एसटी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचीही नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
अशोक खरात प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील महायुती सरकार पोखरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असेल तरी त्यांची संख्या मोठी आहे. पण गृहविभागाकडून काही सिलेक्टिव्ह व्हिडिओच लिक केले जात आहेत, त्यामागे मोठे षडयंत्र आहे. खरातच्या सीएकडे मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्याच्या बातम्या येत आहेत, हा पैसा नेमका कोणाचा असा प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
इंधन टंचाईबाबत फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे
देशात पेट्रोल पंपावर व एलपीची गॅस साठी रांगा लागत आहेत, याचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर फोडले हे हास्यास्पद आहे. काँग्रेस व राहुल गांधी अफवा पसरवत नाहीत तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेत भाषण करताना कोरोनासारखी परिस्थिती असल्याचे विधान केले होते, त्यातूनच लोकांमध्ये लॉकडाऊनची भिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मोदी सराकरचे परराष्ट्र धोरण फसलेले आहे, त्यामुळे जनतेला इंधन व एलपीजी टंचाईला सामारो जावे लागत आहे व भाजपा सरकार मात्र आपली जबाबदारी झटकून काँग्रेसवर आरोप करत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






