RSS च्या 'त्या' मागणीवरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी केली जोरदार टीका
मुंबई : भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे हे सातत्याने त्यांच्या व भाजपा नेत्यांच्या विधानातून उघड होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपा नेते ४०० जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही संविधानाची समिक्षा केली पाहिजे असे वक्तव्य केले होते. तर पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहताना विवेक देबरॉय यांनीही संविधान बदलण्याची गरज आहे असे उघडपणे म्हटले होते. भाजपा व संघ परिवारातून अशा विधानाचे खंडनही केले जात नाही. संविधान, तिरंगा झेंडा हे संघाला मान्य नाही त्यामुळे ते बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे तो आजही कायम आहे.
सात महिन्यांपीर्वी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचार हा संविधानाचा गाभा आहे हे स्पष्ट केलेले आहे तरीही वारंवार संघ आणि भाजपचे लोक सातत्याने याबाबत चुकीची विधाने करून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. हा संविधान बदलण्याच्या व्यापक कटाचा एक भाग आहे. भारताची ओळख ही विविधतेत एकता आहे पण ही ओळखच रा. स्व. संघ व भाजपाच्या डोळ्यात खुपते आहे. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र हाच त्यांचा अजेंडा आहे. लोकशाही व संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने हा अजेंडा लक्षात घ्यावा व लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले आहे.