
कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार घोषित; कोणाला संधी?
पहिली यादी जाहीर करताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी ज्या जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटासोबत जागा वाटप चर्चा सुरू आहे, त्या ठिकाणचे उमेदवार जाहीर केले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जागांवर अजून चर्चा सुरू आहे. यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवीकिरण इंगवले यांच्या शिवाजी पेठेतील प्रभागाचा सुद्धा समावेश आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, विधानपरिषदेतील काँग्रेस गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची ही पहिली यादी निश्चित करण्यात आली आहे.
या यादीत सर्वसाधारण, अनुसूचित जाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) अशा विविध आरक्षण प्रवर्गांतील उमेदवारांचा समतोल राखण्यात आला असून, महिला उमेदवारांनाही मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. काँग्रेसने पहिल्याच यादीतून संघटनात्मक ताकद दाखवत निवडणुकीसाठी तयारी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, उर्वरित प्रभागांतील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता असून, काँग्रेसच्या या पहिल्या यादीमुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात इतर पक्षांच्या याद्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनाही पुन्हा संधी
सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार निवडीवर तिढा कायम असतानाच, लवकर यादी जाहीर केल्यास बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन अनेक पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र काँग्रेसने आघाडी घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये तब्बल ४८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनाही पुन्हा संधी दिली आहे.
तीन कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
काँग्रेसने, जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये तीन कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह त्यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे यांना सुद्धा उमेदवारी दिली आहे. बोंद्रे हे प्रभाग आठमधून लढणार आहेत, तर मयुरी या प्रभाग २० मधून लढतील. राहुल माने यांना प्रभाग नऊमधून उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या पत्नी ऋग्वेदा यांना प्रभाग आठमधून उमेदवारी दिली आहे. माजी महापौर उपमहापौर भुपाल शेटे यांना प्रभाग १८ मधून उमेदवारी दिली असून त्यांची मुलगी पूजा यांना प्रभाग १३ मधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या शारंगधर देशमुख यांच्याविरोधात राहुल माने यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देणे हा जबर धक्का होता. त्यामुळे आता या प्रभागातील लढतीवर अवघ्या शहराचे लक्ष असणार आहे.
मनसे जिल्हाप्रमुख दिंडोर्ले पुरस्कृत उमेदवार
विधान कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवारावरून सर्वाधिक चर्चा आणि राडा झाला. त्या राजेश लाटकर यांना सुद्धा उमेदवारी दिली आहे. लाटकर यांच्यासह संजय मोहिते, मधुकर रामाणे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण यांनाही उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले यांना काँग्रेसकडून पुरस्कृत केले आहे. त्यामुळे मनसे आणि महाविकास आघाडीमध्ये जवळीक सुरू असताना कोल्हापूरमध्ये पाटील यांनी जिल्हाप्रमुखांना उमेदवारी देत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेसची अजूनही बोलणी सुरूच आहे. ठाकरे गटाला १२ जागा निश्चित केल्या असून त्यामध्ये सात जागांवर एकमत झाले आहे. मात्र त्या ठिकाणी उमेदवार अजून निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसांमध्ये उमेदवार निश्चित करून मंगळवारी अर्ज भरण्याचा धडाका होईल अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नाराजी कायम
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाराजी कायम आहे. मात्र उमेदवारी जाहीर करताना पाटील यांनी यासंदर्भात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जागावाटपामध्ये सन्मानजनक जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीने पाटील यांच्यासह इंडिया आघाडीला अल्टिमेटम दिला आहे.