
पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; पिकांची वाढ खुंटली, राहेर परिसरात दुष्काळाचे सावट
नांदेड : यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने राहेर परिसरात दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे विहिरी आणि तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपू लागली असून, अनेक शेतकऱ्यांच्या हातातील सोयाबीनचे पीक जवळपास हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. त्यानंतर पावसाच्या चांगल्या सरी बरसतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली. आतापर्यंतची पावसाची नक्षत्रेही कोरडी गेल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळालेला नाही. पावसाळ्याचे दिवस असतानाही सध्या उन्हाचे चटके जाणवत असून तापमानात वाढ झाली आहे.
रब्बी हंगामाचेही भवितव्य धोक्यात
खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने कर्जबाजारीपणाची चिंता वाढली आहे. विहिरी आणि तलावांतील पाणीसाठाही कमी होत असल्याने आगामी रब्बी हंगामाचे भवितव्यदेखील धोक्यात आले आहे. आभाळात ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र हुलकावणी देत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनसह अन्य खरीप पिके करपू लागली आहेत. शेतकरी तुषार व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविण्याची धडपड करत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
बाजारपेठेवरही परिणाम
पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा राहिलेला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले असून त्याचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवू लागला आहे. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा सध्या तुलनेने ओस पडलेल्या दिसत आहेत.
सण-उत्सवांवरही आर्थिक परिणाम
आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, गौरी, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी असे सण-उत्सव येणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नसल्याने सणासुदीच्या खरेदीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच महागाईची झळ बसत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे आर्थिक गणित अधिकच बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
काटेपूर्णा जलसाठा घटला; पाणीटंचाई पार्श्वभूमीवर विहिरी अधिग्रहणाच्या सूचना