
नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुले नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध नांदेड पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी आठ जणांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सहा जणांना १२ महिन्यांसाठी, तर दोघांना ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
नांदेड ग्रामीण, किनवट आणि इतवारा पोलीस ठाण्यांकडून प्राप्त प्रस्तावांची संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. संबंधितांना नोटिसा बजावून त्यांची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती. नांदेड ग्रामीण हद्दीतील शिवाजी देविदास जाधव (वय ३६), परमेश्वर मारोती बोचरे (वय ४०), मोहम्मद इरफान मोहम्मद गौस (वय ४०) आणि मोहम्मद फैजान मोहम्मद गौस (वय ३२) यांना १२ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. यापैकी जाधव व बोचरे हे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणांत आरोपी आहेत.
किनवट हद्दीतील शेख सोहेल शेख शौकत ऊर्फ गाज्या (वय २१) आणि शेख सलमान ऊर्फ सल्ला महेबुब शेख (वय २६) यांना १२ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे तसेच मोटारसायकल व सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर इतवारा हद्दीतील मजहर खान पी. आरेफखान (वय ३२) आणि खालेदखान पी. आरिफखान (वय ३५) यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ
काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले असता, आरोपी सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.