फोटो सौजन्य सोशल मीडिया
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईतील वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
लहान मुलांच्या पाठीवरील ‘ओझे’ अखेर उतरणार! राज्य सरकारचा शाळांना कडक इशारा; नियम मोडल्यास कारवाई?
दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा, तरुणाईच्या साहसाचा आणि संघभावनेचा जागर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित मानाच्या दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्त पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांच्या मजबूत आधारापासून ते सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदापर्यंत प्रत्येकाचा समन्वय, विश्वास आणि धैर्य या खेळाला यशस्वी करतात. घाटकोपरची दहीहंडी ही मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून, येथे देशाच्या विविध भागांतून येणारी पथके सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव आता केवळ स्थानिक स्वरूपाचा न राहता व्यापक ओळख निर्माण करणारा सांस्कृतिक सोहळा झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी
आज सकाळपासूनच गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ केला. दहीहंडीतून निघालेले ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रदर्शित केले.
यानंतर वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फौंडेशन आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
गोविंदा पथकांनी उंच थर रचताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी आयोजकांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह लोकप्रतिनिधी, गोविंदा पथके व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.






