
Dattatray Bharne
राज्यात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप हंगाम संकटात आला आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक भागांत पिकांचं मोठं नुकसान झालं असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
अकोला येथे अमरावती विभागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यापूर्वी मराठवाड्यातील ७६ तालुक्यांचा आढावा घेण्यात आला होता, तर अमरावती विभागातील ५६ तालुक्यांमधील पीक परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. सरकारकडून एनडीआरएफ, पीक विमा आणि इतर योजनांच्या माध्यमातून मदतीचे पर्याय तपासले जात असल्याचं भरणे यांनी सांगितलं आहे.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं मान्य करत भरणे म्हणाले की, “शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाअभावी हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारकडून विविध विभागांचा आढावा घेतला जात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे.”
“अधिवेशन बोलावण्याची काही गरज नाही. आम्ही सर्व एकच आहोत ना. शेवटी शेतकऱ्याला आपल्याला मदतच करायची आहे, त्यामुळे त्यासाठी अधिवेशनाची गरज नाही,” असं भरणे यांनी म्हटलं.
अकोला येथील आढावा बैठकीदरम्यान काही अधिकारी मोबाईलवर आणि सोशल मीडियावर व्यस्त असल्याचं समोर आलं. या मुद्द्यावर भरणेंनी फारसं महत्त्व न देता शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं.
“कोणी एखादा होपलेस माणूस मोबाईल खेळला, गेम खेळला, याकडे माझ्यासकट आपणही लक्ष देऊ नये. शेतकऱ्याला आधार देणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं सध्या महत्त्वाचं आहे,” असं भरणे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर असल्याचं सांगत त्यांनी त्यांना आधार देण्याची गरज व्यक्त केली. “शेतकऱ्यांनी अनेक स्वप्नं रंगवली आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे. शेतकऱ्याला नीट झोप लागत नाही,” असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळी स्थितीचा व्यापक आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून नेमकी कोणती मदत जाहीर होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.