
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा किस्सा सांगितला आहे. समृद्धी महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचा दावा फडणवीसांनी केला. विशेष म्हणजे, त्यावेळी उद्धव ठाकरे हे महायुतीचा भाग होते, असा उल्लेखही त्यांनी केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत “माझी चाल कासवाची नाही मात्र माझी प्रेरणा कासव आहे,” असं वक्तव्य केलं. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
फडणवीस म्हणाले की, महायुतीचं सरकार असेल आणि एखादं काम पूर्ण मनापासून करण्याचा निर्धार केला, तर सहयोगी पक्षांचीही साथ मिळते. समृद्धी महामार्गाचा निर्णय घेतल्यानंतर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहिलो. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अवघ्या एका वर्षात पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध करणारे लोक आज समृद्धी महामार्गाचं कौतुक करत असल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्यामुळे टीका आणि विरोध झाला तरी काम थांबवायचं नाही, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, आपल्या कार्यशैलीवर टीका करणाऱ्यांनाही फडणवीसांनी मिश्कील अंदाजात उत्तर दिलं. “माझी चाल कासवाची नाही मात्र माझी प्रेरणा कासव आहे,” असं ते म्हणाले.
यामागचं कारण सांगताना ते म्हणाले की, जेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते किंवा दगडफेक केली जाते, तेव्हा ते कासवाप्रमाणे आपल्या शेलमध्ये जातात. म्हणजेच टीकेला प्रत्येक वेळी उत्तर देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम सुरू ठेवण्यावर त्यांचा भर असतो.
राजकारणात एखाद्या प्रकल्पाला सुरुवातीला विरोध होणं आणि नंतर त्याच प्रकल्पाची चर्चा होणं, हा अनुभव आपल्याला आला असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे टीका कितीही झाली तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होता काम करत राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे समृद्धी महामार्गाचा निर्णय, त्यावेळचा राजकीय विरोध आणि त्यांच्या कार्यशैलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.