उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात लागलीत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने काम सुरू केले आहे. या निवडणुकीची तयारी ज्याने त्याने आपआपल्यापरीने सुरू केली आहे. आम्ही आमचे काम करत आहोत व पक्षाचे कार्यकर्तेही आपआपल्यापरीने काम करीत करायला लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्यावेळी मी या निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महायुती म्हणून याबाबत भूमिका मांडेन,अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महायुतीतील आमच्यातील काही सन्मानीय सहकारी कधी आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असे वक्तव्य करतात तर, कधी आम्ही आमचे स्वतत्र लढणार असेही वक्तव्य करणार. परंतु याचा अंतिम निर्णय हा वरिष्ठच घेणार आहे. उद्याच्या वर्धापनदिनी सकाळ उदघाटन सत्रापासून इतर नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आपआपली मते मांडतील, विविध विषयावर चर्चा करतील. सायंकाळी समारोप कार्यक्रमात मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत भूमिका मांडणार आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार याबाबत विचारले असता ते त्यांचे ठरवतील. पण त्या पक्षाचे हितचिंतक असतात त्यांना जे वाटते ते बोलतात. दरम्यान सध्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार याबाबत चर्चा आहे, यावर बोलताना पवार यांनी याबाबत प्रश्न विचारयाचा अधिकार तुम्हाला आहे, पण त्याला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे असे सांगून त्यावर अधिकचे भाष्य टाळले. मुंबईतील दोन लोकलमधील प्रवाशांच्या अपघातात बाबत बोलताना पवार यांनी शोक व्यक्त करीत, रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईमधील रेल्वे वाहतुकीचे ऑडिट करणे जरूरी असल्याचे सांगितले. मध्य रेल्वेच्या मुंब्रा दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल रेल्वे एकमेकांच्या जवळून जातात. पीक हावरमध्ये या गाड्या जवळून जात असतात हे माहित असताना देखील लोक या लोकलच्या दरवाजात लटकलेले असतात. त्यांना त्यांचा वेळ महत्वाचा असतो.
मात्र रेल्वेला ज्या प्रमाणे दरवाजा असतो, त्याप्रमाणे लोकलला नसतो. त्यामुळे या दोन लोकल जवळून जात असताना टकलेले प्रवासी घासले गेले व त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. मुंबईमध्ये प्रवासासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकल आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने रेल्वे पुल, ट्रॅक आदींची कामे करीत असते. आता मुंबईमधील रेल्वे वाहतुकीचे ऑडिट करणे जरूरी आहे. तातडीने आणखी उपाययोजना करून प्रवाशांचा जीव सुरक्षित राहील यासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत.
आता एक मागणी होते की लोकलला दरवाजे बसवावे परंतु, पण कितपत ते शक्य आहे हे माहित नाही. पण जेव्हा लोकल येते व निघते तेव्हा चालत्या लोकलमध्येच प्रवासी उतरतात व चढतात हे मीही राजकाणात येण्यापूर्वी लोकलप्रवास करताना अनुभवले आहे. असे सांगून पवार यांनी ही शक्यता होऊ शकत नाही. दरम्यान या घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे. याबाबत निश्चितच चौकशीचे आदेश निघालेच असतील पण याबाबत राजकीय व्यक्तींनी काय बोलावे तो त्यांचा अधिकार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर सांगितले.