अरुण गवळींची लेक निवडणूक लढणार (फोटो- टीम नवराष्ट्र)
राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार
निवडणूक आयोग लवकरच घोषणा करण्याची शक्यता
अखिल भारतीय सेना राजकीय आखाड्यात उतरणार
मुंबई: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकासाठी अखिल भारतीय सेनेचे संस्थापक ‘डॅडी’अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत लगबग सुरू आहे. अरुण गवळी उर्फ डॅडी सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी त्यांच्या दोन्ही कन्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘डॅडी’ची कन्या गीता गवळी या आधीपासूनच राजकारणात आहेत. त्या भायखळ्याच्या नगरसेविकाही होत्या. अरुण गवळी यांची दुसरी कन्या योगिता गवळी या सुद्धा आता महापालिका निवडणुकीच्या अखिल भारतीय सेनेकडून राजकीय आखाड्यात उतरल्या असल्याची माहिती गीता गवळी यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.
काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या आणि अरूण गवळीच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा आता अरुण गवळींची मुलगी योगिता लढण्याच्या तयारीत आहे .तुरुंगात असलेलेे ‘डॅडी’आता बाहेर आल्याने आणि विभागात केलेल्या अफाट कामांमुळे प्रचाराची फारशी गरज न पडता आम्ही दोघीही निवडून येऊ असा विश्वास अखिल भारतीय सेनेच्या नेत्या गीता गवळी यांनी या प्रसंगी व्यक्त केला .
अखिल भारतीय सेनेकडून माझी बहीण ॲड. योगिता गवळी ह्या वार्ड नंबर २०७ मधून महानगरपालिका निवडणूक लढविणार असून वार्ड नंबर २१२ मधून मी स्वतः महापालिका निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तर इच्छुक आणि अखिल भारतीय सेनेच्या यादीतील दुसर्या घोषित उमेदवार योगिता गवळी यांनी निवडणूक लढविणे म्हणजे एक उत्साहपूर्ण जबादारी असल्याचे म्हटले आहे . मी एका एन जी ओ मार्फत भायखळा विभागात कायम लोकांशी संपर्कात रहात असल्याने लोक मला फक्त डॅडी ची मुलगी म्हणून नाही तर योगिता म्हणून सुद्धा ओळखतात आणि याचा फायदा मला निवडणुकीत नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला आहे
लोकांची कामं कधी संपत नाहीत .आणि देवाच्या कृपेने मला जास्तीत जास्त लोकांची कामे करायची असल्याचे गीता गवळी या प्रसंगी म्हणाल्या. आतापर्यंत आम्ही जनतेच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच जनता पुन्हा आमच्या हाती सत्ता देईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मोठा निर्णय
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाकडून नवीन तारीख देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या अर्जावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला काही काळ मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्यासाठी 31 जानेवारी 2026 ही नवीन तारीख देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला काहीसा दिलासा मिळाला आहे.