सौजन्य - नवराीष्ट्र टीम
बारामती : पवार साहेबांशी तुलना मी करणार नाही, त्यांच्या कामाला तोडच नाही, मात्र आतापर्यंतच्या झालेल्या आमदारांपैकी सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न केला, ज्या दिवशी या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याचे मी बंद करेन, त्या दिवशी तुम्हाला समजेल, जे चांगले काम करतात त्यांना चांगल नाही म्हटल तरी चालेल पण किमान नाउमेद तरी करु नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली उद्विगनता बोलून दाखवत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कामगिरीचे अप्रत्यक्ष कौतुक केले.
बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बारामती शहरात कुठेतरी पावसाचे पाणी साचते लगेच त्याचे फोटो व्हिडीओ काढून टाकले जातात, लाडक्या बहिणींनाही इतर पर्यायी रस्ता असतो; मात्र त्या पाण्यातूनच त्या दुचाकी नेण्याचा प्रयत्न करतात, लाडक्या बहिणीही कधीतरी दोडक्या असल्यासारख्या वागतात. काही जण त्यांना तसे करायला लावतात. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊन तेथील अवस्था बघा आणि मग बारामतीची तुलना करा, असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आपण सर्वाधिक विकास कामे बारामतीमध्ये करून शहर व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. आजपर्यंतच्या सगळया आमदारांचे काम पाहिले तर माझे काम वेगळे आहे. मी पवारसाहेबांशी तुलना करत नाही, साहेबांची कामाची पध्दत वेगळी होती आणि त्याला तोडच नाही, मी जेव्हा आमदार झालो तेव्हा कायम मला माझे मन सांगायचे की, तुझी तुलना प्रत्येक वेळेस पवार साहेबांशी होणार असल्याने तुलाही प्रचंड काम करावे लागेल. सकाळी पाच वाजता उठून मी आजही कामाला लागतो, मी कामाचा माणूस आहे, मी फक्त कामच करत राहतो. हे शहर आपले आहे. देशातील सर्वोत्तम शहर व्हावे या भावनेने मी काम करतो, खरच सांगतो माझ्यासारखा आमदार तुम्हाला कधीच मिळणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
बारामती सहकारी बँकेच्या कामकाजाचे कौतुक करताना बँकेचा एनपीए ० टक्केवर आणल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिनंदन केले.