मुंबई | राज्यामध्ये आमदार अपात्रतेबाबत निर्णय (MLA Disqualification Case) लागल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) पक्षपाती असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत (Sanjay Raut) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कायदा कळत नाही असा घणाघात देखील केला आहे.
आमदार अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लागला असून कोणत्याही आमदारवर अपात्रतेची कारवाई झालेली नाही. यामुळे राज्यातील सरकार देखील स्थिर राहिले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “काल अध्यक्षांनी दिलेला निकाल कायदेशीर प्रकारचा निकाल आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे व त्यांना वैध ठरवले. त्यामुळे आमचे सरकार पूर्ण मजबूत सरकार आहे, कोणाच्या मनात शंका असू नये. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. न्यायालयाने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निर्णय दिला त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन” अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल नार्वेकरांचे कौतुक करत सरकार स्थीर असल्याचे सांगितले.
तसेच फडणवीस यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांना कायदा कळत नसल्याचा टोला देखील फडणवीसांनी लगावला. संजय राऊत सत्ताधाऱ्यांना चोर म्हणाले होते यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी कोणाला चोर म्हणावं याबाबत आम्हाला घेणे देणे नाही. एक खरं आहे यातून निराशा झळकत आहे.” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.