DCM Devendra fadnavis reaction on wanawadi case
पुणे : लहान मुलींवर अत्याचार झालेले बदलापूर प्रकरण ताजे असताना पुण्यामध्ये देखील असाच संतापजनक प्रकार घडला आहे. वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 8 वर्षांच्या दोन मुलींवर व्हॅनमध्ये व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुण्यामध्ये वातावरण तापले आहे. पालकांनी रोष व्यक्त केला असून या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
वानवडी अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला पळून जाण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी वानवडी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले आहे की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल,” असे आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
हे देखील वाचा : संतापजनक! पुण्यात दोन चिमुरड्यांवर स्कुल बस ड्रायव्हरने केला अत्याचार
पुढे फडणवीस म्हणाले की, “या घटनेत आणखी काही पीडित मुली आहेत का? याचाही तपास केला जात आहे. शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने मुलींना चुकीच्या पद्धतीने हात लावला. एका मुलीच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आणखी एका मुलीला त्याने अशाच प्रकारे हात लावल्याचे समोर आले आहे. म्हणून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थाचालकांनाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. या माध्यमातून सर्व संस्था चालकांना आम्ही निर्देश देत आहोत की, त्यांनी त्यांच्या त्यांच्या शाळेतील वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष द्यावे. चालक आणि इतर कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्याबाबत योग्य माहिती ठेवावी,” असेही मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
वंचितकडून वाहनाची तोडफोड
वानवडी प्रकरणातील स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली आहे. पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात असलेली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन दगडाने फोडली आहे. स्कूल व्हॅनची तोडफोड केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते म्हणाले की, त्या स्कूल व्हॅनमध्येच लहान मुलीवर अत्याचार झाला. आम्हाला देखील लहान मुलं आहेत. आज लहान मुली, महिला सुरक्षित नाही. सरकारनं हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सर्वात मोठी शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.