पुणे : एकीकडे पोलीस तडीपारी अन् गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे प्रयत्न करत असताना पुण्यात एका तडीपार गुंडानेच एनसीपीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पण, तडीपारीची कारवाई केल्यानंतरही तो शहरात आला अन् फिरला कसा असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार (वय ३५, रा. शांतनगर, वानवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, महेश गाढवे, अतुल गायकवाड, हरिदास कदम, विठ्ठल चोरमले, राहुल गोसावी, अमोल गायकवाड आणि निळकंठ राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पुणे पोलिसाकंडून अनेक गुन्हेगारांना तडीपार केले जात आहे. पण, अनेकजन पुन्हा शहरात येत असल्याचे वास्तव आहे. पोलिसांच्या आदेशाला हे गुन्हेगार धुडकावत शहरात वास्तव्य अन् गुन्हे करत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, या गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, श्रीधर शेलार हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्हयातून तडीपार केले होते. त्याला जुलै २०२१ मध्ये तडीपार केले होते. तरीही तो वानवडी परिसरात फिरत होता.
दरम्यान, त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याघटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, तो पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान तो दारूच्या नशेत असताना वानवडी पोलिसांनी त्याला सापळा रचुन अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीत घातक शस्त्रे आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहेत.