कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव; आवाज उठवणाऱ्यांना नापास करण्याच्या धमक्या
राम खांदारे मुंबई: राज्यातील निवासी डॉक्टर प्रचंड मानसिक दबावाखाली काम करत असून, परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या थीसिसवर सही मिळवण्यासाठी दोन ते तीन लाख रुपयांची मागणी केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी डॉक्टरांच्या संघटनांकडून समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.(फोटो सौजन्य – istock)
निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळा अत्यंत अनियमित असून काही ठिकाणी सलग १२ तास, तर काही ठिकाणी ४८ तासांपर्यंत ड्युटी करावी लागत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत शैक्षणिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना डॉक्टरांवर दुहेरी ताण निर्माण होत आहे. परीक्षेला बसण्यासाठी थीसिस सादर करणे अनिवार्य असते. मात्र, या थीसिसवर विभाग प्रमुखांची सही मिळवण्यासाठी मोठी रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. “सही हवी असेल तर पैसे भरा,” अशा थेट अटी घालण्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मिरज, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंबेजोगाई अशा अनेक ठिकाणी हा प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या डॉक्टरांना नापास करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे.
हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा
काही ठिकाणी डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण केले जाते, तर काहींना प्रत्यक्ष रुग्णसेवेपासून दूर ठेवले जाते. सर्जरी शिकणाऱ्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची संधी नाकारली जाते, अशीही तक्रार आहे. शिक्षणात अडथळे निर्माण होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी मौन बाळगत असल्याचे चित्र आहे. निवासी डॉक्टरांच्या या समस्या सोडविण्यासाठी मध्यवर्ती मार्ड आणि फायमा या संघटना एकत्र आल्या असून त्यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. एकूणच, निवासी डॉक्टरांकडून थीसिससाठी पैशांची मागणी, कामाचा ताण आणि मानसिक दबाव या तिहेरी संकटामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, तातडीने हस्तक्षेपाची गरज व्यक्त केली जात आहे.






