Jalgaon News:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
चोरट्याला पकडताना झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, संशयितालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी व पंचायत समितीचे सिव्हिल इंजिनीअर हर्षल मधुकर भोई (३१) हे सोमवारी रात्री जेवण आटोपून कुटुंबासह झोपले होते. मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू आल्याने त्यांना जाग आली.
त्यांनी खिडकीतून पाहिले असता काही इसम कॉलनीत संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. प्रसंगावधान राखत भोई यांनी तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना सावध केले.
भोई यांचा आवाज ऐकून कॉलनीतील गोकुळ भगवान न्हावी (२५), अर्जुन धनराज पाटील (५०), पंढरीनाथ छन्नू पाटील (६२) आणि भूषण भीमराव पाटील (३४) है नागरिक तत्काळ घराबाहेर धावून आले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच संशयितानी तेथून पळ काढला. याच वेळी रात्रगस्तीवर असलेले शहर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि पोलिसांनी मिळून पाठलाग करत एका संशयिताला ताब्यात घेतले आशिष शिवा चव्हाण (वय १९, रा. कन्हेरी, ता. उकशी, जि. धार, मध्य प्रदेश) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी आशिष चव्हाण याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्यासाठी झटापट केली. या झटापटीत पोलीस कर्मचारी अक्षय पाटील यांच्या हनुवटीला मार लागून ते जखमी झाले, तर पोलीस कर्मचारी जगन्नाथ पाटील यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली.
दुखापत होऊनही दोन्ही कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत संशयिताला निसटू दिले नाही, रात्रगस्त ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक पवन देसले यानी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याऱ्यांसह संशयित आशिष चव्हाण याला चौपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्राथमिक तपासानुसार, आशिष चव्हाण हा श्रीकृष्ण कॉलनीतील महेंद्र वना पाटील यांच्या बंद घरात घरफोडी करून चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






