महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास; भाजपच्या 'त्या' पदाधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार?
पुणे : महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्याविराेधात भाजपचे वरीष्ठ नेते कारवाई का करीत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर पदाधिकाऱ्याच्या विराेधात महापालिकेच्या सुरक्षा विभागानेही पाेलिसांकडे तक्रार केली हाेती. तसेच सदर महीलेने राज्य महीला आयाेगाकडे तक्रार करण्यापुर्वी भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार केली हाेती. परंतु, त्याच्यावर पक्षाकडून काेणतीच कारवाई झाली नाही.
भाजपच्या एका आघाडीचा पदाधिकारी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे. महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेतली असून महापालिकेकडून माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या एका आघाडीचा शहराध्यक्ष दहा ते पंधरा कार्यकर्ते सोबत घेऊन महापालिका भवनात येतो. अनेकवेळा महापालिकेच्या प्रवेशद्वारापासूनच हे लोक घोषणाबाजी करत व गोंधळ घालत आतमध्ये येताना दिसतात. हा पदाधिकारी जमाव घेवून महापालिकेतील विविध विभागामध्ये जातो. त्याठिकाणी माहिती मागतो, आताच माहिती पाहिजे म्हणून कार्यालयात किंवा दरवाजात ठिय्या मारून घोषणाबाजी करतो, यामुळे आतील व्यक्तीला बाहेर येता येत नाही आणि बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाता येत नाही. दुसरीकडे त्याचे कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीचे चित्रीकरण करतात. या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सुरक्षा विभागाने शिवाजीनगर पाेलिस ठाण्याला पत्र पाठविले हाेते. या पदाधिकाऱ्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी या पत्राद्वारे केली गेली हाेती.
महिला अधिकाऱ्याने जानेवारी महीन्यात या पदाधिकाऱ्याविराेधात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली हाेती. महापालिकेच्या अराेग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महीला तक्रार निवारण समितीकडे या महीला अधिकाऱ्याने तक्रार केली आहे. या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली. मात्र, पुढे नक्की काय कारवाई झाली, हे समितीकडून कळविण्यात आले नाही. कोणाकडूनच काहीच कारवाई होत नसल्याने अखेर महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन गेल्या आठवड्यात महापालिकेला भेट दिली. तसेच तक्रारदार महिला अधिकाऱ्यांकडून तसेच इतरांकडून माहिती घेतली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रकरणी संबंधितावर कठाेर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांच्याकडे केली आहे. यावेळी शहरप्रमुख संजय माेरे आणि गजानन थरकुडे यांच्यासह पृथ्वीराज सुतार, राम थरकुडे, विजय देशमुख आदी उपस्थित हाेते.
हे सुद्धा वाचा : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी
भाजपचे नेते गप्प का?
सदर पदाधिकाऱ्याविराेधात महापालिकेच्या सुरक्षा विभागाने तक्रार केली हाेती. आता एका महीला अधिकाऱ्याने राज्य महीला आयाेगाकडे तक्रार केली आहे. तसेच यापूर्वी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे या महीला अधिकाऱ्याने तक्रार केली हाेती. परंतु भाजपच्या नेत्यांकडून काेणतीच कारवाई या पदाधिकाऱ्यावर केली गेली नाही किंवा त्याला समज दिली गेली नाही.
‘‘ मी नुकताच या पदावर रजू झालाे असून, यासंदर्भात मला अद्याप माहीती मिळाली नाही. अधिकाऱ्यांना विनाकारण काेण त्रास देऊन मानसिक खच्चीकरण करणार असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.’’
– नवल किशाेर राम ( आयुक्त, पुणे महापालिका )
‘‘आरोग्य विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांची तक्रार समितीकडे आली होती. त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवून समितीने आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत.’’
– डॉ. कल्पना बळीवंत, अध्यक्ष, अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती, महापालिका