संग्रहित फोटो
पुणे : पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे २ हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (दि. ९ जून) सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने या गावांतील शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विमानतळासाठी जागा आरक्षित करण्यात आली असून, त्यावर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे या जमिनीची आता खरेदी विक्री होऊ शकणार नाही. त्यानुसार भूसंपादनासाठी ३२ (२) च्या नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या नोटिसीनंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २९ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी त्यावर २ हजार ५२ हरकती नोंदविल्या. त्याची सुनावणी आता सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी तीन अधिकारी नियुक्त करण्यात आले असून हेच अधिकारी ही सुनावणी घेतील.
भूसंपादन, तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी या जमिनीची मोजणी आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन मे रोजी यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गावकऱ्यांनी आंदोलन करीत त्याला जोरदार विरोध केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ मे रोजी बैठक घेऊन सर्वेक्षण थांबविण्याची सूचना केली. भूसंपादनासाठी त्या जागेचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्याची आवश्यकता आहे. ते होत नसल्याने भूसंपादन रखडण्याची शक्यता आहे.