
'एआय'साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित “कृषिक २०२६” कृषी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आदींच्या उपस्थितीत झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. दरम्यान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश नलावडे व त्यांच्या टीमने या प्रदर्शनाची माहिती मान्यवरांना दिली.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास खर्च, नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापक डॉ. रश्मी दराड, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे चअरमन राजेंद्र पवार यांनी स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार, कृषिमंत्री भरणे व इतर मान्यवरांनी कृषी प्रदर्शनातील अत्याधुनिक शेती प्रयोगाची तसेच पशुप्रदर्शनाची पाहणी करून सर्व प्रयोगांची माहिती घेतली.
तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पन्न वाढवावे
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,१० वर्षापूर्वी बारामती कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यानंतर कृषी क्षेत्रात वेगवेगळे संशोधन झाले, त्यामुळे कृषी तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल झाले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक वापर करून उसासह सर्वच पिके तसेच फळबागांचे उत्पादन वाढण्यासाठी यशस्वी करण्यात आलेले प्रयोग शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. सध्या जग बदलत चालले आहे, शेतीचे तंत्रज्ञान बदलत चालले आहे, या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये एआय या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल. याबाबत शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. हे तंत्रज्ञान सध्या शेतकऱ्यांसाठी महाग असले तरी शासनाकडून, अनुदानाच्या स्वरूपात मदत केली जात आहे. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सखोल माहिती घेऊन हे तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरून भरघोस उत्पन्न वाढवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.