कोरेगाव : प्रत्येक गावात देवाची यात्रा, मिरवणुका आणि उत्सवात ढोल लेझीमचे डाव रंगायचे अन् सारा माहोल रंगायचा अनोख्या उत्साहात. माणसं एकत्र यायला ही ढोलवरची एक थाप पुरेसी, ढोलावर टिपरी घुमली की गावकऱ्यांनी ताल धरलाच म्हणून समजायचा, लेंगा सदरा घातलेली जुनी जाणती मंडळी अगदी आवेशात डावाला आकार द्यायची. यात नवी तरुणाई त्याच्याकडे पाहत पावलावर पाऊल टाकून हा लेझीमचा डाव अंगात आत्मसात करायची, असा जुन्या नव्याचा संगमातून गावच्या चौकात लोककला रातरातीला जागवली.
जायची बरं प्रत्येक गावची ढोलाची चाल आन लेझीमचा ठेका वेगवेगळा अगदी तिथला सिक्रेट फॉर्म्युला, पिढ्यानपिढ्या जुन्या नव्यानी फक्त हाताचे इशारे समजून घेत आन पावलाकडे बघत ठेका धरला. कित्येक जत्रेच्या छबिण्याच्या रात्री लोककलेने जागवून पुढे पुढे पोहोचवला. अगदी जशाचा तसा, याच कुठे शिक्षण न्हाई की लिखित नियम फक्त अनुकरण करत ही लोककला पिढ्यानपिढ्या पुढे जात राहिली, हे विशेष मानायला हवयं. पण हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली डॉल्बी आली आणि सारच लोकचित्र हरवलं आन सुरू झाला वेडावाकडा धिंगाणा..गावातली पोरं या डॉल्बीलाच आपली संस्कृती मानू लागले. मग यात्रा, जत्रा, वराती आण मिरवणूक सगळ्यात ही लोककला मागे पडली, डॉल्बी पुढे हिचा आवाज दबला गेला.
आपल्या वैभवशाली लोकसंस्कृतीवर मर्यादा आल्या तरुणाई या डावात रमत नाही. लेंगा सदरा घातलेली पिढी आहे. तोपर्यंत हा वारसा जीन्स टी शर्टमधील पिढीला समजला पाहिजे. प्रत्येक गावाने आपली ढोलाची चाल, लेझीमचा ठेका गावच्या घराघरातील तरुणाईपर्यंत पोहचवला पाहिजे. कारण आधुनिक म्हनून आपण आपली लोकजीवनाची मातीची मूळ उखडून टाकण्याऐवजी संवर्धन केले पाहिजे. ग्लोबल आणि श्रीमंती जमान्यात हाच आपला समृद्धीचा आणि आनंदाचा पासवर्ड असणार आहे तो विसरुन कसा चालेल.