
MAHAGENCO Solar Power Plant Fire
कौडगाव परिसरात महाजनको आणि जर्मनीतील केएफडब्ल्यू (KfW) बँकेच्या आर्थिक सहकार्याने सुमारे ३०० एकर क्षेत्रावर हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे ५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. प्रकल्पातील एका भागात अचानक आग लागल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता वाढत गेल्याने स्थानिक पातळीवरील प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर धाराशिव आणि बार्शी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
या घटनेमुळे प्रकल्पातील अग्निसुरक्षा आणि देखभाल व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रकल्पाचे क्षेत्रफळ मोठे असताना त्या तुलनेत सुरक्षा आणि देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आग लागली त्यावेळी तांत्रिक तज्ज्ञ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आग विझविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, प्रकल्प परिसरातील स्वच्छता आणि गवत काढण्याची जबाबदारी सिन्टेक कंपनीकडे असल्याचे सांगण्यात येते. मात्र, घटनेच्या वेळी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याची माहिती आहे. परिसरात वाढलेले गवत आगीच्या प्रसारास कारणीभूत ठरले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून देखभाल आणि स्वच्छतेची कामे नियमितपणे केली जात होती का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
आगीमुळे १५ मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती बंद पडली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास एका दिवसात सुमारे चार लाख युनिट विजेचे संभाव्य नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महाजनकोला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सिन्टेक कंपनीच्या कामकाजाबाबत जॉइंट व्हेंचर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) समूहाकडे तक्रारी करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील देखभाल, स्वच्छता, मनुष्यबळ आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण, प्रत्यक्ष झालेले नुकसान आणि जबाबदारी याबाबत अधिकृत चौकशीनंतरच स्पष्टता येणार आहे.
Ans: धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसी परिसरातील तांबेवाडी येथील महाजनकोच्या सौरऊर्जा प्रकल्पाला भीषण आग लागली.
Ans: या आगीमुळे प्रकल्पातील १५ मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती ठप्प झाली आहे.
Ans: आग विझविण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षक नंदू कुलकर्णी यांच्या पायाला भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.