
धाराशिवमध्ये कडकडीत बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ RPI, रिपब्लिकन सेना आणि वंचित आघाडी रस्त्यावर
बंद यशस्वी करण्यासाठी सकाळी धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापारी बांधवांना शांततामय वातावरणात दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत बंद शांततेत पार पाडण्यावर भर दिला.
या बंद आंदोलनाला आरपीआय (खरात), रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. बंदच्या पार्श्वभूमीवर आरपीआय जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विकास बनसोडे आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव भाई फुलचंद गायकवाड यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना निवेदन सादर केले. निवेदनात आंदोलन संविधानिक चौकटीत, लोकशाही मार्गाने आणि पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने पार पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली.
दरम्यान, देशपांडे स्टँड, खाजा नगर आणि गणेशनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या प्रकारामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी बससेवा तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र बंदला धाराशिव जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, वाहनचालक, शेतकरी, कामगार, विविध सामाजिक संघटना तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा आयोजकांनी केला. बंद यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. बहुतांश ठिकाणी बंद शांततेत पार पडला असला, तरी देशपांडे स्टँड, खाजा नगर व गणेशनगर परिसरातील दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली आणि कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही.